बाल दमा आणि उपाय

बाल दमा 

प्रस्तावना

मोठया माणसांप्रमाणे लहान मुलांनाही दमा होऊ शकतो. याला बालदमा म्हणतात. यासाठी पोट उडणे, डबा, इत्यादी नावेही आहेत. बालदमा वयाच्या सहा महिन्यांनंतरच येतो. याआधी दम लागण्याचा आजार दिसल्यास न्यूमोनिया गटातला आजार आहे असे समजा.

सहा महिन्यांनंतर येणारा दमाही दोन प्रकारचा असतो. पहिल्या प्रकारचा बाळदमा पाच वर्षानंतर आपोआप नाहीसा होतो. मात्र दुसरा प्रकार पाच वर्षानंतरही टिकून राहणारा असतो. बाळदमा असणा-या बाळाच्या रक्ताच्या नातेवाईकांत (आई, वडील, भाऊ, बहीण,काका, मामा, मावशी, आत्या, आजोबा, आजी, इ.) दम्याचा विकार असल्यास त्या बाळाचा दमा कायमचा विकार होण्याची शक्यता असते. मात्र बाळदमा कोणत्या प्रकारचा आहे हे आधी ठरवणे अवघड आहे.

बाळदमा : कारणे

 • पन्नास टक्के बाळदम्यांमध्ये आनुवंशिकता हे कारण असते.
 • वावडे, विषाणुदाह, राग-दु:ख, इत्यादी भावना यांमुळे अशा मुलांना दम्याची सुरुवात होऊ शकते.
 • आनुवंशिक नसणारा बाळदमाही वावडे (धूळ, परागकण, दमट हवा ) किंवा फुप्फुसाच्या विषाणुदाहामुळे होऊ शकतो.
 • दम्यामध्ये श्वासनलिका अरुंद होणे, आतल्या आवरणाला सूज येणे आणि चिकट पाझराने बेडका तयार होणे या तीन प्रमुख प्रक्रियांमुळे हवेचा मार्ग अरुंद होतो. यामुळे श्वसनास जास्त श्रम लागतात. यामुळे धाप लागणे, श्वास वेगाने चालणे, खोकला, इत्यादी लक्षणे दिसतात.
 • ताप असल्यास जिवाणूदाह हे तापाचे कारण असू शकेल.
 • दम्याची तीव्रता कमी-जास्त असू शकते.

रोगनिदान

 • बाळदम्यात धाप, दम लागणे, जड खोकला ही मुख्य लक्षणे असतात.
 • थोडा ताप असू शकतो पण खूप ताप असेल तर न्यूमोनियाची शक्यता लक्षात ठेवावी.
 • धाप-दम लागण्याचा त्रास वारंवार होण्यावरून बाळदम्याचे निदान निश्चित करता येते.
 • न्यूमोनियातही दम्यासारखा त्रास होतो हे लक्षात ठेवा.

उपचार

 • उलटी करवणे हा घरगुती आयुर्वेदिक उपाय ब-याच वेळा उपयोगी पडतो. यासाठी वेखंड मधात उगाळून त्याचे चाटण दिल्यास उलटी होते.
 • त्यातून चिकट स्त्राव पडून जातात आणि दमा कमी होतो. याने काही फरक न पडल्यास सालमाल (औषध किंवा गोळी) औषध चांगले उपयोगी पडते.
 • या औषधांनी श्वासनलिका रुंद, मोकळया होतात. यामुळे श्वसन सोपे होते.
 • ताप खूप असल्यास पॅमॉल आणि जंतुविरोधी कोझाल, ऍमॉक्सी ही औषधे चालू करावीत.
 • मात्र अशा उपायांनी बाळदमा बरा होत नसेल तर वरील उपचार देऊन डॉक्टरकडे पाठवून द्यावे. रुग्णालयात यासाठी औषधी वाफारा दिला जातो. याने ताबडतोब आराम पडतो.

बाळदमा 

प्रिय पालकांनो आपल्या बाळाला वारंवार खोकला आणि दम लागत असेल पण ताप नसेल तर तो बाळदमा आहे असे समजा. बाळदमा वयाच्या 1-5 वर्षांपर्यंत येऊ शकतो.

बाळदम्याची कारणे

 • आनुवंशिक आणि वावडेजनक कारणांच्या संयोगाने बाळदमा होतो. हवाप्रदूषणानेही बाळदमा उद्‌भवतो.
 • विषाणूंमुळे येणाऱ्या सर्दीतापानेही बाळदमा सुरू होऊ शकतो.
 • पावसाळी किंवा हिवाळी हवेत बाळदमा जास्त आढळतो.

लक्षणे आणि चिन्हे

 • बालकाला सर्दी, शिंका अशा त्रासाने सुरुवात होते.
 • यानंतर श्वास घेणे अवघड होऊन छातीचा आवाज यायला लागतो.
 • श्वसन उथळ आणि जलद होते, नाकपुड्या फुलतात.
 • मूल मोठे असेल तर छाती दाटल्याचे सांगते.
 • खोकल्याची मधून मधून उबळ येते.
 • श्वास सोडताना शिट्टीसारखा आवाज येतो.
 • बाळदमा अधून मधून येतो. मात्र दरम्यान मुलाची तब्येत ठीक-ठाक असते.
 • लहान वयाची बालके बाळदम्याच्या श्वसनाच्या त्रासाने रडतात.
 • दम लागल्याने पोट उडताना (हाबके मारताना) दिसते.
 • जास्त त्रास असल्यास ओठ आणि हाताची त्वचा निळसर दिसते.
 • न्यूमोनियात जसा सुरुवातीपासून ताप असतो तसा बाळदम्यात नसतो. पण ताप 2-3दिवसांनी येऊ शकतो.

प्राथमिक आणि वैैद्यकीय उपचार

 • बाळदम्याचा पहिलाच प्रसंग असेल तर बाळाला ताबडतोब डॉक्टरांकडे न्या. डॉक्टर तातडीक उपचार करतील तसेच घरी घेण्यासाठी औषधे सांगतील.
 • बाळदम्यात सामान्यपणे इंजेक्शन आणि सलाईनची गरज नसते. श्वसनमार्गातून औषध योग्य ठिकाणी बरोबर पोहोचते.
 • तोंडाने घ्यायच्या गोळ्यादेखील श्वासमार्ग मोकळा ठेवायला मदत करतात.

तातडीक उपचारांमध्ये तीन स्वरूपात औषधे मिळतात.  अ) 100 डोसचे फवारे असलेला स्प्रे. या स्प्रेतून दर वेळी ठरावीक मात्रेत औषध बाहेर येते. फवाऱ्याचा खटका दाबणे आणि श्वास घेणे एकाच वेळी करावे लागते. बालकांना हे जमत नसल्याने स्पेसरचा उपयोग करावा लागतो. आपले डॉक्टर आपल्याला याबद्दल सांगतील. हे औषध घरीपण वापरता येते. ब) रोटाहेलर या प्रकारात औषधाच्या कॅपशूलमध्ये पावडर असते. हा प्रकार जास्त स्वस्त पडतो. क) रुग्णालय किंवा दवाखान्यात नेब्यूलायझर वापरतात.

घरी उपचार घ्यायचा असला तरी आपल्या डॉक्टरांना फोनवर कळवावे हे चांगले.

काही तपासण्या

 • बाळदमा कोणत्या पदार्थाच्या वावड्यामुळे येतो हे शोधण्यासाठी वावडे तपासणी करावी.
 • छातीचा क्षयरोग किंवा न्यूमोनिया आहे/नाही हे तपासण्यासाठी छातीचा एक्स-रे लागू शकेल.
 • दमा 5 वर्षांनंतर टिकला तर फुप्फुसांची क्षमता तपासावी लागते. यासाठी पी.एफ.टेस्ट. करतात.

प्रतिबंध

 • ऋतूमानाप्रमाणे बाळदमा कमी-जास्त होतो. यासाठी थंडी-पावसात काळजी घ्या. ऊबदार कपडे चांगले.
 • अशा बालकांना सर्दीताप झालेल्या व्यक्तीपासून शक्यतो दूर ठेवा.
 • वावड्याचे कारण मिळाल्यास दमा टाळण्यासाठी प्रयत्न करता येतो.
 • वाढत्या हवा प्रदूषणामुळे बाळदमा वाढत आहे. धूळ आणि प्रदूषण यापासून अशा बाळांना शक्यतो सुरक्षित ठेवा.
 • बाळदम्याची लक्षणे, चिन्हे दिसताच डॉक्टरांशी संपर्क करायला पाहिजे.

विशेष सूचना

 1. बाळदमा हा बराच काळ चालणारा आणि कमी-जास्त होणारा आजार आहे. याला कायमचा नाही पण तात्पुरता उपाय आहे.
 2. पालकांना या आजाराची आणि उपचारांची नीट माहिती पाहिजे. यामुळे विनाकारण मनस्ताप, चुकीची आशा-निराशा, उगाचच भीती किंवा डॉक्टर बदलत राहणे या गोष्टींना आळा बसेल.
 3. आपल्या बालकाच्या आजाराबद्दल बालवाडीच्या शिक्षिकांना सांगून ठेवा. तसेच प्रथमोपचाराची औषधे आणि आपला फोन नंबर देऊन ठेवा.
 4. 5 वर्षं वयानंतर बहुतेक बालकांचा दमा आपोआप थांबतो. मात्र काहींना यानंतरही दमा चालूच राहतो.
 5. श्वसनोपचार म्हणजे निरनिराळे सोपे प्राणायाम मुलांना शिकवा. फुगा फुगवण्याचा व्यायामही चांगला आहे.
 6. मुलाला त्याचा नेहमीचा खेळ खेळू द्या. खेळामुळे श्वसनमार्ग मोकळा आणि निरोगी राहतो. पण सोबतच्या बॅगमध्ये औषधे ठेवायला पाहिजे.
 7. अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू दमा असूनही यशस्वी झाले. पालकांनी निराश न होता योग्य काळजी घ्यावी.
 8. कुडमुडे वैद्य किंवा भोंदू डॉक्टरांचा सल्ला-उपचार घेऊ नका. ही मंडळी बऱ्याच वेळेला स्टेरॉईड औषधांचा अतिरेक करतात.

1 thought on “बाल दमा आणि उपाय”

Leave a Comment

en_USEnglish